नवी दिल्ली -अरुणाचल प्रदेश राज्यातून बेपत्ता झालेले पाच तरुण चीनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय लष्कराने हॉटलाइनवरून पाठवलेल्या संदेशाला चिनी सैन्याने उत्तर दिले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री आणि पूर्व अरूणाचल प्रदेशचे खासदार किरण रिजीजू यांनी याबाबत माहिती दिली. या पाच युवकांना भारताच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेवर चिनी प्रशासन काम करत असल्याचे रिजीजू म्हणाले आहेत.
किरण रिजीजू यांनी ट्विट करून ही माहिती दिली. 'भारतीय लष्कराने पाठवलेल्या हॉटलाइन संदेशाला चिनी लष्कराने उत्तर दिले आहे. अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेले पाच तरुण चीनच्या प्रदेशात आढळून आले आहेत. या पाच तरुणांना भारतात माघारी आणण्यासाठीच्या प्रक्रियेवर चिनी प्रशासन काम करत आहे, असे ट्विट रिजीजू यांनी केले. सिंगकूम, प्रसात रिंगलिंग, दोंगतू इबिया, तानू बाकेर आणि नागुरु दिरी अशी या पाच तरुणांची नावे आहेत.