जयपूर - राजस्थानमधील कोटा जिल्ह्यामध्ये कोरोनाची एक केस समोर आली आहे. येथील एमबीएस रुग्णालयात उपचार आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आलेल्या ५० वर्षीय कोरोना संभाव्य व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या चाचणीचा अहवाल हा सोमवारी त्यांच्या मृत्यूनंतर प्राप्त झाला असून ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. रुग्णालय प्रशासनाने या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाला आयसोलेट करून शवगृहात ठेवले आहे. तर, शासनाने ठरवलेल्या निर्देशानुसार त्यांच्यावर अंत्यक्रिया करण्यात येणार आहे.
राजस्थानच्या कोटामध्ये कोरोनाचा पहिला बळी, मृत्यूनंतर आला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल
राजस्थानच्या कोटा शहरात ४ एप्रिलला दुपारी २ वाजता एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यांना कोरोनासंभाव्य असल्याने एमबीएस रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यूनंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
माहितीनुसार, तेलघर येथील ५० वर्षीय व्यक्तीला ४ एप्रिलला दुपारी २ दरम्यान रुग्णालयात कोरोना संभाव्य म्हणून दाखल करण्यात आले होते. त्यांना दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या चाचणीतून पहिला नमुना घेऊन जयपूरला तपासणीकरता पाठवण्यात आला होता. मात्र, त्याच रात्री या रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दिवशी प्राप्त झालेल्या अहवालात सदर व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोटा जिल्ह्यात आत्तापर्यंत ३४० पेक्षा जास्त जणांची चाचणी करण्यात आली असून त्यातील ही पहिली पॉझिटिव्ह केस समोर आली आहे. तर, सदर मृत व्यक्तीला कुणाच्या संपर्कात आल्याने कोरोना झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या बळीनंतर प्रशासनाने सदर व्यक्ती राहत असलेल्या आसपासच्या भीमगंज मंडी ठाणे परिसरात कर्फ्यू लावला असून येथील नागरिकांना ये-जा करण्यास बंदी घातली आहे. यासोबतच आरोग्य विभागाने त्या परिसरातील संपूर्ण घरांची स्क्रिनींग सुरू केली आहे. तर, मृत व्य्क्तीच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना आणि व्यक्तींना एमबीएस रुग्णालयात दाखल केले असून अशा एकूण ६० जणांची स्क्रिनींग सुरू केली आहे. तर, या व्यक्तीच्या मृत्यूनंतर राजस्थानमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या ६ झाली असून राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही २७४ झाली आहे.