कोची - भारतीय नौदलातील लेफ्टनंट दिव्या शर्मा, लेफ्टनंट शिवांगी स्वरुप आणि लेफ्टनेंट शुभांगी यांचे एक पथक डॉर्नियर विमानाच्या एमआर मिशनसाठी भरारी सज्ज झाल्या आहेत. डॉर्नियर एयरक्राफ्टच्या मेरिटाइम रेकॉनिसन्स मिशनसाठी नियुक्ती करण्यात आलेले महिलांचे हे पहिलेच पथक आहे.
गुरुवारी रक्षा प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही वैमानिकांनी 'डॉर्नियर विमानाचे परिचलन' केले आहे. 27व्या डॉर्नियर ऑपरेशनल फ्लाइंग ट्रेनिंग कोर्समध्ये एकूण सहा वैमानिक सहभागी झाले होते. यात या तिन्ही महिला वैमानिक डॉर्नियर विमान परिचलनाचा भाग होत्या असे, दक्षिण नौदल कमांडर यांनी सांगितले. गुरुवारी आयएनएस गरूडमध्ये आयोजित केलेल्या पासिंग आउट समारोहात या तिन्ही महिला वैमानिकांना मरीन रेकॉनिसन्स (एमआर) वैमानिकाची पदवी मिळाली.
यातील लेफ्टनंट शुभांगी ही उत्तर प्रदेशातील तिल्हार येथील रहिवासी आहे. लेफ्टनंट दिव्या शर्मा ही मूळची मालवीय नगर, नवी दिल्ली, तर लेफ्टनंट शिवांगी स्वरुप बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातली आहेत. या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला भारतीय वायुसेनेसह (सॉफ्ट) कोर्सपूर्वी अंशतः नौदलाबरोबर प्राथमिक उड्डाण प्रशिक्षण सुरू केले होते.