मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे भारतात रुग्ण आढळून आल्याने 22 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे अनेक नागरिक भारताबाहेर अडकले होते. अशा नागरिकाना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत आज सकाळी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथून 225 भारतीयांना घेऊन विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.
मिशन वंदे भारत : सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अडकलेले 225 भारतीय मायदेशी परतले - सॅन फ्रान्सिस्को
आज सकाळी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथून 225 भारतीयांना घेऊन विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी याबाबत टि्वट केले आहे. त्यांनी एअर इंडिया, महाराष्ट्र सरकारचे पाठिंबा आणि सहयोग दिल्याबद्दल आभार मानले आहेत. या सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करून ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवून गरेजनुसार उपचार केले जाणार आहेत.
'वंदे भारत मिशन' ऑपरेशन अंतर्गत विविध देशांमध्ये ६४ विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या मिशनच्या पहिल्या टप्प्यामध्ये १४ हजार ८०० नागरिकांना भारतात आणले जाणार आहे. ७ मे पासून हे मिशन सुरू करण्यात आले असून सर्व प्रवाशांकडून एका बाजूच्या प्रवाशाचे भाडे घेण्यात येत आहे. मलेशिया, लंडन, दुबई येथून भारतियांना परत आणण्यात आले आहे.