इंदूर - अवैध उत्खनन करणाऱ्या दोन व्यक्तींवर जिल्हा प्रशासनाने मोठी कारावाई केली आहे. प्रशानाने दोन्ही व्यक्तींना ५.१ कोटीचा दंड ठोठवला आहे. शनिवारी खनिज आणि महसूल विभागाकडून दोन्ही दोषींवर कारवाई झाल्यानंतर जिल्हा प्रशसनाने हा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अभय बेडेकर यांनी दंडासंबंधी आदेश काढले आहेत.
आदेशानुसार, चेतन पटवारी आणि कुणाल पटवारी (दोन्ही रा. बिजालपूर जि. इंदोर) या दोघांना हा दंड ठोठवण्यात आला आहे. मुरुमाचे अवैध उत्खनन आणि कारवाईला आलेल्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केल्याचा कुणालवर आरोप आहे.
अधिकारी राऊ येथे अवैध उत्खनन थांबवण्यासाठी आले होते. राऊ हे माजी मंत्री जितू पटवारी यांचा मतदारसंघ आहे. ते कुणालचे नातेवाईकही आहेत. कारवाईवेळी अधिकाऱ्यांवर दगडफेक झाली होती. याप्रकरणी जून महिन्यात तेजाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कुणालला अटक करण्यात आली. काल त्याच्यावर ५.१ कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आला.