हैदराबाद - प्रख्यात अभिनेता आणि दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती खालावली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती रितेश देशमुख यांनी दिली आहे. हैदराबादमधील गचीबौली येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी त्यांना लिव्हर सीरियोसिस आणि अन्य आजारांचे संक्रमण झाल्याचे वृत्त होते. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. आज सकाळी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
'डोंबिवली फास्ट' या मराठी सिनेमाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. 11/7 च्या मुंबई ट्रेन ब्लास्टवर आधारित 'मुंबई मेरी जान' या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. इरफान खान यांनी काम केलेल्या 'मदारी' चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. तसेच जॉन अब्राहमने मुख्य भूमिका साकारलेल्या 'फोर्स' आणि 'रॉकी हॅन्डसम' या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.
अभिनयातही त्यांनी स्वत:चे नशीब आजमावले. 'रॉकी हॅन्डसम' या स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात त्यांनी व्हिलनची भूमिका साकारली. तसेच सातच्या आत घरात, जुली २, भावेश जोशी या चित्रपटांत त्यांनी अभिनय केलाय.