नवी दिल्ली :केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा आज २५वा दिवस आहे. आजचा दिवस हा श्रद्धांजली दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान आपले प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले.
आतापर्यंत ३३ शेतकऱ्यांचा मृत्यू..
शेतकरी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३३ शेतकऱ्यांचा या आंदोलनामध्ये मृत्यू झाला आहे. यामध्ये अपघात, आजार आणि थंडीमुळे झालेल्या मृत्यूंचाही समावेश असल्याचे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले. ४० मुख्य शेतकरी संघटना आणि सुमारे ५०० इतर शेतकरी संघटनांमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर गेल्या २४ दिवसांपासून बसून आहेत.
सकाळी ११ ते एकपर्यंत शोकसभा..
रविवारी सकाळी अकरा वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत विविध संघटना शोकसभा, मानवी साखळी आणि मृत शेतकऱ्यांच्या फोटोपुढे दिवे लावत त्यांना श्रद्धांजली वाहतील. ऑल इंडिया किसान सभेने शनिवारी एका पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या सर्व शेतकऱ्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, असेही सभेने यावेळी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदींनी दिली रकाबगंज साहिब गुरुद्वाराला भेट..
या सर्व आंदोलनादरम्यान, आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रकाबगंज साहिब गुरुद्वाराला भेट दिली. शीखांचे नववे धर्मगुरू तेग बहादुर सिंग यांची शनिवारी पुण्यतिथी होती, यानिमित्ताने मोदींनी या गुरुद्वारामध्ये जात त्यांना श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचा :उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आयोजित करणार 'किसान संवाद'; पंतप्रधान साधणार शेतकऱ्यांशी संवाद..