नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुमारे अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. अद्याप यावर तोडगा निघाला नाही. दरम्यान, शेतकरी नेत्यांनी आज देशव्यापी चक्का जामची घोषणा केली आहे. राजधानी दिल्ली क्षेत्रात आंदोलन करणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
दुपारी १२ ते ३ या वेळात चक्का जाम -
दिल्ली वगळून देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. दुपारी १२ ते ३ या वेळात हे आंदोलन होणार आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका आणि स्कूल बसेसला यातून वगळण्यात येईल, असे संयुक्त किसान मोर्चाने स्पष्ट केले आहे. दिल्लीत राजाने स्वतःच किलेबंदी केली आहे. तिथे आपल्याला जाम करण्याची गरज नाही. दिल्ली वगळता देशभरात शेतकरी चक्का जाम आंदोलन करतील असे राकेश टिकैत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. दिल्लीकडे जाणाऱ्या वाहनांना थांबवून पाणी आणि अन्न दिले जाईल. तसेच सरकार आमच्यासोबत काय करीत आहे हे त्यांना समजावून सांगू असे टिकैत म्हणाले.
संसदेत कृषी कायद्यांवरून गदारोळ -
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून कृषी कायद्यांवर चर्चा व्हावी, ही मागणी विरोधकांनी सतत लावून धरली आहे. सरकार कृषी कायद्यांवर आता चर्चा करण्यास तयार झाले आहे. 'विरोधकांनी कृषी कायद्याची काळी बाजू दाखवावी, असे आव्हान केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे. कृषी कायद्यांमुळे ससंदेच्या दोन्ही सभागृहात काल गोंधळ झाल्याने अनेक वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.