नवी दिल्ली -केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नवे कृषी विधेयक हे क्रांतीकारी असून देशातील शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना कृषी मालाची थेट विक्री करता येणार आहे. याचसोबत शेतमालाच्या किंमतीची हमी, पीकांमधील वैविध्य, नव्या तंत्रज्ञानाचा वापराने शेती करण्यासाठी आवश्यक तरतूद कमी होणार असल्याचे मत कृषीमंत्र्यांनी व्यक्त केले.
कृषी विधेयकांमुळे देशात नव्या क्रांतीची नांदी, केंद्रीय कृषी मंत्र्यांना विश्वास
नव्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल होणार असल्याचा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या खास मुलाखतीत कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषीविधेयकांमुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे शेतकऱ्यांची कृषीउत्पन्न बाजार समित्यांच्या जोखडातून मुक्तता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढे अल्पभूधारक शेतकऱ्यांना पेरणीपासून त्यांच्या संपूर्ण उत्पादनाची हमी मिळणार आहे. यामुळे छोट्या शेतकऱ्यांना यापुढे महागातील पिकांचे उत्पादन काढता येणार आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान, नवे बियाणे, चांगल्या दर्जाच्या कीटकनाशकांच्या वापरासह शेतकऱ्यांची आर्थिक तरतूद देखील घटणार असल्याचे कृषीमंत्री म्हणाले. तसेच या विधेयकांमधील तरतुदींमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.