गांधीनगर - गुजरातचे गरबानृत्य हे जगभरात प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गुजरातच्या गरबाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमिवर गुजरातमध्ये पारंपरिक गरबा नृत्याव्यतिरिक्त वेगळे काहीतरी करण्यावर सर्वांचा भर आहे.
अहमदाबादच्या सुप्रसिद्ध सुफी नृत्य कलाकार बीना मेहता आणि त्यांच्या विद्यार्थ्याीनींनी यंदाच्या नवरात्रोत्सव एक आगळ्यावेगळ्या कलाकृतीचे सादरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक गरबा नृत्याला सुफी नृत्याची जोड देऊन त्यांनी 'सुफी गरबा' या थीमचा अविष्कार केला आहे. सुफी गरब्याची तालीम करायलादेखील त्यांनी सुरवात केली आहे. यासाठी पारंपरिक गरबा वेषभूषेपेक्षा वेगळ्या प्रकारची वेषभूषा त्यांनी परिधान केलेली पाहायला मिळाली. घेरदार सुफी पायघोळ लेहंगा आणि स्कार्फचा वापर त्यांनी केला आहे.