नवी दिल्ली- द्वेषमूलक पोस्टच्या नियंत्रणावरून दबाव वाढला असतानाच अखेर फेसबुकने राजकीय नेत्यावर कारवाई केली आहे. फेसबुकने भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे अकाउंट बंद केले आहे. पोस्टमधील मजकूर हा द्वेष आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा असल्याने फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.
राजा सिंह यांना फेसबुकवर बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी फेसबुकच्या धोरणांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने त्यांचे अकाउंट काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेतील माध्यमाने फेसबुककडून भारतामध्ये भाजपच्या धोरणाला अनुकूल निर्णय घेण्यात येत असल्याचे म्हटले होते. फेसबुकने भाजपचे आमदार राजा सिंह यांच्या द्वेष पसरविणाऱ्या पोस्टकडे दुर्लक्ष केल्याचे अमेरिकेच्या माध्यमात म्हटले होते त्यानंतर काँग्रेसने फेसबुक कंपनीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यानंतर संसदेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीने फेसबुकला समन्स पाठविले आहे. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनीही फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना पत्र पाठवून पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.