महाराष्ट्र

maharashtra

'सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी चीननं प्रामाणिकपणे काम करावं'

By

Published : Aug 7, 2020, 1:21 PM IST

जुलैच्या मध्यवधीपासून सीमावादावरील चर्चा रेंगाळली आहे. पँगाँग त्सो, डेपसांग या भागातून चीन मागे हटायला तयार नसल्याने चर्चा पुढे जात नाही. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करी स्तरावर चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. मात्र, चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चर्चेत अडचणी येत आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील सीमेवरील तणाव पूर्णपणे कमी करण्यासाठी चीन प्रामाणिकपणे काम करेल, अशी आशा भारताने काल (गुरुवार) व्यक्त केली. दोन्ही देशांमधील विशेष प्रतिनिधी स्तरावर झालेल्या मतैक्यानुसार चीनने काम करावे, असे भारताने म्हटले आहे. दरम्यान, लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी अरुणाचल प्रदेशात नियंत्रण रेषेवर लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करी स्तरावर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चर्चेत अडचणी येत आहेत.

एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले, पूर्व लडाखमधील सीमावादावर तोडगा काढण्यासाठी 5 जुलै रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग ई यांच्यात विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा झाली. त्यामध्ये सीमेवरील तणाव संपूर्ण कमी करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये मतैक्य झाले आहे. नियंत्रण रेषेवरून दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्याचे चर्चेत ठरले आहे. दोन्ही देशातील करार आणि नियमावलीनुसार तणाव कमी करुन सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येईल, असे मान्य करण्यात आले आहे.

भारत तणाव कमी करण्याच्या उद्दिष्टाशी कटिबद्ध आहे. चीननेही तणाव कमी करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे, त्यामुळे सीमेवर शांतता आणि सौदार्ह पुन्हा प्रस्थापित होईल, असे श्रीवास्तव म्हणाले. जुलैच्या मध्यवधीपासून सीमावादावरील चर्चा रेंगाळली आहे. पँगाँग त्सो, डेपसांग या भागातून चीन मागे हटायला तयार नसल्याने चर्चा पुढे जात नाही.

भारतातील चिनी कफ्युशस इन्स्टिट्यूटचे काम थांबविण्याबाबत भारत विचार करत आहे का? असा प्रश्न श्रीवास्तव यांना विचारला असता, ते म्हणाले, अशा केंद्रासाठी भारत सरकारची एक नियमावली आहे. जर त्याचे उल्लंघन होत असेल, तर नक्कीच कारवाई होऊ शकते. 2009साली भारताने परदेशी सांस्कृतिक केंद्रांबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. हे नियम सर्व परदेशी सांस्कृतीत संस्थांना लागू असल्याचे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details