सिल्चर -आसाम पोलिसांनी परदेशातून तस्करी करून आणलेल्या वन्यप्राण्यांची सुटका केली आहे. आसाममधील बराक व्हॅली परिसरात पोलिसांनी कारवाई करत एक कांगारु, सहा मकाऊ पोपट, तीन कासव आणि दोन माकडांना तस्करांच्या तावडीतून सोडविले आहे. या वन्यप्राण्यांना म्यानमारमार्गे मिझोरामध्ये आणण्यात आले होते. तेथून त्यांना ट्रकमधून गुवाहटीला नेण्यात येत असताना पोलिसांनी ट्रक पकडला.
‘मंगळवारी मध्यरात्री आम्ही मिझोरामकडून येणाऱ्या टीएस 08 यूबी 1622 या ट्रकला तपासणीसाठी थांबविले. या ट्रकमधून घाण वास येत असल्याबाबत चालकाला विचारले असता, आतमध्ये फळे असून काही फळे सडल्याचे त्याने सांगितले. मात्र, ट्रकची झडती घेण्यात आल्यानंतर आतमध्ये कांगारु, सहा मकाऊ जातीचे पोपट, तीन कासव आणि दोन माकडे पिंजऱ्यात ठेवलेले आढळले’, असे धोलाई विभागाचे वनअधिकारी देवोरी यांनी सांगितले.