२० वर्षांपासून एक्झिट पोलचे भाकीत चुकतेय - व्यंकय्या नायडू - vice president
'निकाल जाहीर होईपर्यंत प्रत्येक पक्ष आपणच जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त करत असतो. त्यामुळे खरा निकाल एक्झिट पोल्सप्रमाणेच लागेल असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल,' अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

अमरावती - 'एक्झिट पोल्सनी वर्तवलेले भाकीत १९९९ पासून चुकीचे ठरत आहे. २३ मे रोजी जाहीर होणारे निकाल याहून वेगळे असू शकतात.'यामुळे एक्झिट पोल्सने दिलेला 'कल' निकाल म्हणून पाहता येणार नाही. खरे निकाल वेगळे असू शकतात,' अशी शक्यता भाजपचे माजी नेते आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे.
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे एका अनौपचारिक बैठकीला नायडू यांनी रविवारी संबोधित केले. यावेळी एक्झिट पोलचे निकाल जाहीर होताच सर्वांनी नायडूंचे अभिनंदन करत भाजप सत्तेत येईल, अशी आशा व्यक्त केली. मात्र, एक्झिट पोलच्या निकालाविषयी नायडूंनी अत्यंत सावध भूमिका घेतली.
'प्रत्येक पक्षाला आपणच जिंकू अशी आशा वाटत असते. निकाल जाहीर होईपर्यंत प्रत्येक पक्ष आपणच जिंकू असा आत्मविश्वासही व्यक्त करत असतो. पण या विश्वासाला काहीच आधार नसतो. त्यामुळे खरा निकाल एक्झिट पोल्सप्रमाणेच लागेल असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल,' अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
देशात कोण सत्तेत येईल याबद्दल विचारले असता, 'देशात कोण सत्तेत येईल हे मला माहीत नाही. कोणी यावे याबद्दल मी बोलणार नाही. पण काहीही झाले तरी आज देश आणि राज्यांना कुशल नेता आणि स्थिर सरकारची गरज आहे,' असे ते म्हणाले. 'समाजातील बदलानुसार, राजकीय पक्षांमध्ये बदल झाला पाहिजे,' असे मत त्यांनी व्यक्त केले.
रविवारी जाहीर झालेल्या सर्वच एक्झिट पोल्सनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पुन्हा सत्तेत येणार असल्याचे भाकीत व्यक्त केले आहे. सर्व एक्झिट पोल्सची सरासरी काढली तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २९६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, एक्झिट पोल्सचे भाकीत खोटे ठरेल, असे मत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे. याउलट भाजप एकहाती ३००चा आकडा पार करेल असा विश्वास अनेक भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. अशावेळी नायडूंसारख्या ज्येष्ठ नेत्याने भाजपच्या नेत्यांच्या डोळ्यात यानिमित्ताने अंजन घातल्याचे मत व्यक्त केले जात आहे.