नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणातील आरोपी मुकेश सिंगने 'डेथ वॉरंट' विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने डेथ वॉरंट रद्द करण्यास नकार दिला आहे. तसेच दया अर्ज प्रलंबित असल्याबद्दल ट्रायल कोर्टाला सुचना देण्यास दोषीच्या वकिलांना सांगितले आहे.
दयेचा अर्ज प्रलंबित असल्याने डेथ वॉरंट रद्द करण्यात यावा, अशी मागणी दोषी मुकेशचे वकिल रेबेका जॉन यांनी केली होती.
आरोपींना फाशीची शिक्षा २२ जानेवारीला देता येणार नाही, राष्ट्रपतींनी दया याचिकेवर निकाल दिल्यानंतरच पुढील प्रक्रिया होईल, असे तिहार तुरुंगाचे स्टॅडींग काऊन्सेल राहुल मेहरा यांनी सुनावणीवेळी सांगितले. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज रद्द केल्यानंतर १४ दिवसानंतरच आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येईल. अर्ज रद्द झाल्यानंतर आरोपींना १४ दिवस आधी नोटीसद्वारे माहिती द्यावी लागते, त्यानंतर फाशीची शिक्षा देता येते, आम्ही नियमांनी बांधले गेलो असल्यामुळे आता फाशी देता येणार नसल्याचे मेहरा म्हणाले.