शिमला - दोन दशकांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांनी पाहिलेले स्वप्न मोदी सरकारच्या काळात पूर्ण होत आहे. रोहतांग पासला लेह-लडाखशी जोडणारा 'अटल बोगदा' पूर्ण झाला असून त्याचे येत्या 3 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण करणार आहेत. याबाबत हिमाचल प्रदेशचे तंत्र शिक्षणमंत्री डॉ. रामलाल मारकंडा यांनी माहिती दिली.
हिमाचल तंत्र शिक्षण मंत्री डॉ. रामलाल मारकंडा बोगादा उद्घाटनाच्या निमित्ताने संपूर्ण हिमाचल आणि विशेषतः लाहौल स्पीतीमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. एसपीजीच्या पथकाने सर्व सुरक्षा व्यवस्थांचा आढावा घेतला आणि एक सुरक्षा आराखडा तयार केला आहे. हिमाचल सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तयारीसंदर्भात चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींना सर्व तयारीची जाणीव करून देण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाहौलमध्ये पारंपरिक पद्धतीने स्वागत होईल.
रोहतांग पासला लेह-लडाखशी जोडणारा 'अटल बोगदा' पूर्ण हे असणार या बोगद्याचे फायदे....
सुमारे 10 हजार फूट उंचीवर तयार करण्यात आलेला हा सर्वात लांब बोगदा आहे. हा बोगदा 9 किलोमीटर लांब असून 10 मीटर रुंद आहे. या बोगद्याच्या निर्माणासाठी जवळपास 10 वर्षांचा कालावधी लागला आहे. परंतु, त्यामुळे आता हिमाचल प्रदेश लेह-लडाख भागाला कायम जोडलेला राहणार आहे. सेनेची हत्यारे आणि इतर सामग्री आता वर्षभरात कोणत्याही वेळेत सहजच पोहचवले जाणे शक्य होणार आहे. बोगद्यामुळे मनाली आणि किलाँगमधील 46 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे.
जवळपास वर्षभर हा बोगदा बर्फाने झाकलेला असेल. हिमस्खलन अथवा दरड कोसळून अपघात होऊ नये म्हणून ह्या बोगद्याच्या दोन्ही बाजूला सेन्सर बसवण्यात आले आहेत. ज्याची यंत्रणा डी.आर.डी.ओ.ने विकसित केली आहे. 'अटल बोगदा' देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या काळात भारतीय सेनेसाठी वरदान ठरणार आहे.