जगभरात थैमान घातलेला कोरोना आता हळूहळू भारतातही पसरत आहे. देशात सध्या याचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. तो तिसऱ्या टप्प्याकडे जाऊ नये, यासाठी सरकार अनेक निर्णय घेत आहे. जनतेनेही या आणीबाणीच्या काळात खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
तर दुसरीकडे, चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत चालला आहे. चीनने या विषाणूशी कसा लढा दिला, भारताने आणि भारतीयांनी त्यातून काय शिकायला हवे, तसेच चीनमध्ये आता कशी परिस्थिती आहे? या सर्व गोष्टींबद्दल चीनमधील अनिवासी भारतीय संघटनेच्या शांघाय शाखेचे माजी अध्यक्ष, अमित वाईकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली. त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी अपर्णा वाईकर, आणि मोठा मुलगा अनीश वाईकर हेदेखील आपल्यासोबत आहेत. पाहूयात त्यांच्या या विशेष मुलाखतीमधील ठळक मुद्दे..
VIDEO : चीनमधील कोरोना आटोक्यात, भारतीयांनी काय खबरदारी घ्यावी? पहा विशेष मुलाखत - भाग ५ प्रश्न - एक विद्यार्थी म्हणून अनीश तुझा या सर्वाबाबत काय अनुभव होता?
अनीश- गेल्या २२ जानेवारीपासून आमची शाळा बंद आहे. शाळेत जाता येत नसल्यामुळे येथील शिक्षकांनी ई-लर्निंग सुविधा सुरू केली आहे. यामुळे आमची शाळा बंद असली, तरी आमचा अभ्यास सुरूच आहे. आमचे शिक्षकही सध्या जिथे कुठे आहेत, तिथून नियमित आपापले व्हिडिओ अपलोड करत आहेत. सध्या आमच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
प्रश्न - भारतामध्ये सध्या सोशल बॉयकॉटिंगच्या घटना घडत आहेत. असा प्रकार चीनमध्ये आढळून आला का? त्यावर तुम्ही काय केले?
अपर्णा- सोशल बॉयकॉट हा प्रकार येथे कधीच नाही झाला, कारण लोकांना तेवढा वेळच नाही मिळाला. भारतात कोरोनाबाबत सर्वांनाच माहिती आणि भीती आहे, त्यामुळे कोणीही संशयित आढळला, तरी त्याला बॉयकॉट करण्याचे प्रकार होताना दिसून येत आहेत. चीनमध्ये याचा प्रसार वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर होत होता. तसेच, नागरिकांनाही याबाबत वेळोवेळी आवश्यक ती माहिती मिळत असल्यामुळे त्यांच्या मनात अनावश्यक भीती नव्हती. त्यामुळे भारतात जे प्रकार होताना दिसत आहेत, तसे इथे आढळून आले नाहीत.
प्रश्न - भारताने, आणि भारतीयांनी यावेळी काय खबरदारी घ्यावी?
अमित- भारतामध्ये खबरदारीचे उपाय नक्कीच सुरू झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी शाळा, कार्यालये, मॉल्स बंद करण्यात आले आहेत. बऱ्याच कार्यालयांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, लोकांनी या सुट्टीचा वापर बाहेर फिरण्यासाठी नाही, तर घरात बसण्यासाठी करणे गरजेचे आहे.
कुटुंबातील लहान मुले, आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, या विषाणूचा आणि उष्णतेचा संबंध नाही. त्यामुळे तुमच्या भागामध्ये खूप उकाडा आहे, म्हणून तुमच्याकडे हा विषाणू येणारच नाही, हा भ्रम टाळा. बरेचसे सार्वजनिक कार्यक्रम रद्द होताना दिसत आहेत, हे नक्कीच आशादायी आहे.
अमितजींनी या मुलाखतीमध्ये जे मुद्दे मांडले त्यातून एक गोष्ट नक्कीच आपल्या लक्षात येईल, की देशातील नागरिकांनी आता खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे. पुढचे दोन ते तीन महिने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून खबरदारी घ्यावी लागणार आहे. आपण आत इथेच थांबूया... पण तुम्ही-आम्ही काळजी घेऊया!
या मुलाखतीचा पहिला भाग पाहण्यासाठी क्लिक करा :EXCLUSIVE : 'कोरोना' उद्रेक, अन् चीनमधील अनुभव.. पाहा विशेष मुलाखत!