जगभरात थैमान घातलेला कोरोना आता हळूहळू भारतातही पसरत आहे. देशात सध्या याचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. तो तिसऱ्या टप्प्याकडे जाऊ नये यासाठी सरकार अनेक निर्णय घेत आहे. जनतेनेही या आणीबाणीच्या काळात खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
तर दुसरीकडे, चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत चालला आहे. चीनने या विषाणूशी कसा लढा दिला, भारताने आणि भारतीयांनी त्यातून काय शिकायला हवे, तसेच चीनमध्ये आता कशी परिस्थिती आहे? या सर्व गोष्टींबद्दल चीनमधील अनिवासी भारतीय संघटनेच्या शांघाय शाखेचे माजी अध्यक्ष, अमित वाईकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली. पाहूयात त्यांच्या या विशेष मुलाखतीचा दुसरा भाग...
VIDEO : 'कोरोना' उद्रेक, अन् चीनमधील अनुभव.. विशेष मुलाखत - भाग २ कोरोनाबद्दल पहिल्यांदा समजल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती? चीनमध्ये सध्या जे भारतीय आहेत, त्यांची परिस्थिती कशी आहे?
अमित- आम्ही गेल्या दहा वर्षांपासून चीनमध्ये आहोत. तसेच, भारतीय संघाचा मी माजी अध्यक्ष असल्यामुळे इथल्या भारतीयांशी आम्ही चांगलेच जोडले गेलो आहोत. चीनमध्ये जवळपास ७५ हजार भारतीय आहेत. शांघायमध्ये साधारणपणे ३,५०० भारतीय आहेत. अमेरिका आणि इंग्लंडच्या तुलनेत ही संख्या नक्कीच कमी आहे. मात्र, ही संख्या कमी असल्यामुळे आमच्यामधील जवळीक अधिक आहे. इथे जात-प्रांत हे सर्व गौण आहे. इथे आम्ही सर्व 'भारतीय' आहोत.
चीनमधील नववर्षांच्या सुट्ट्यांमुळे बरेच भारतीय मायदेशी, किंवा बाहेरच्या देशांमध्ये गेले होते. भारतीय दूतावासाने आपल्या कार्यालयात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आम्ही साधारणपणे १०० लोक तिथे गेलो, कार्यक्रम पार पडला. त्यानंतर तिथे आम्हाला कार्यालयातून बरीचशी चांगली माहिती देण्यात आली. तोपर्यंत लोकांच्या मनात थोडीफार आशा होती.
३ फेब्रुवारीला मात्र, एअर इंडियाने सांगितले की आपण चीनमधील विमानसेवा बंद करण्यात आली. तेव्हा मात्र इथल्या बहुतांश भारतीयांच्या आशा मावळल्या. भारतासोबतच बऱ्याच देशांनीही आपापल्या विमानसेवा बंद केल्या होत्या. त्यावेळी आम्ही मात्र चीनमधून जाण्याऐवजी इथेच थांबण्याचा निर्णय घेतला. त्याला कारण म्हणजे, एक तर आम्ही इथे भारतीयांचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे नैतिकरित्या ती आमची जबाबदारी होती. आणि दुसरे म्हणजे, आठ तास विमान प्रवास करण्यापेक्षा इथे चीनमध्ये आम्ही जास्त सुरक्षित होतो.
चीनने या सर्व प्रकाराशी कसा लढा दिला, तसेच चीन सरकारवर माहिती लपवल्याचा आरोपही झाला, याबद्दल काय सांगाल?
अमित- चीनमधील आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर. भारतात ज्याप्रमाणे व्हॉट्सअॅप आहे, त्याप्रमाणे चीनमध्ये 'वुईचॅट' आहे. मात्र, ते केवळ संवादासाठी किंवा फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यापुरते मर्यादित नाही. वुईचॅटच्या माध्यमातून आपण पेमेंटही करू शकतो, किंवा स्विग्गी वा झोमॅटोप्रमाणे जेवणही मागवू शकतो. असे वेगवेगळे सुमारे ५० अॅप्स या एका अॅपमध्ये आहेत. सुमारे ९०० दशलक्ष लोक हे अॅप वापरतात. याच माध्यमातून सरकारने लोकांना सांगितले, की घराबाहेर पडू नका, तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी तुम्ही या अॅपवरून मागवा. त्यानंतर सरकारने यात नवी प्रणाली जोडली. यामध्ये आपली नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कोरोनासंबंधीची सर्व माहिती त्या अॅपवर मिळू शकत होती. कोणत्या सुविधा सुरू आहेत, कोणत्या भागात जाणे सुरक्षित आहे, कोणता भाग असुरक्षित आहे ही सर्व माहिती तिथे मिळत होती. यासोबतच, देशात किती रुग्ण आहेत, तुमच्या शहरात किती रुग्ण आहेत, अगदी तुमच्या इमारतीतही किती रुग्ण आहेत ही माहितीही मिळत होती.
चीनमध्ये सध्या स्थिती हळूहळू पूर्ववत होत आहे. थेट विमानसेवा बंद केल्या असल्यामुले कोणी थायलंड, क्वालालांपूर अशा मार्गे चीनमध्ये परत येत आहेत.
अमितजींशी आपण चीनमधील त्यांच्या अनुभवासंबंधी आणखीही चर्चा केली आहे. पुढील भागामध्ये आपण कोरोनाचा जगातील, चीनमधील आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असलेल्या परिणामांबाबत जाणून घेणार आहोत. हा भाग पाहण्यासाठी क्लिक करा :VIDEO : 'कोरोना'मुळे भारताला मिळतील व्यापारासंबंधी छुप्या संधी; पहा विशेष मुलाखत - भाग ३
या मुलाखतीचा पहिला भाग पहा :EXCLUSIVE : 'कोरोना' उद्रेक, अन् चीनमधील अनुभव.. पाहा विशेष मुलाखत!