सातारा- चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये आत्तापर्यंत एक हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लागण झाली आहे. इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून हुबेई प्रांताचा इतर भागाशी संपर्क तोडण्यात आला आहे. वुहानसह येथील अनेक मोठी शहरे सुनसान आहेत. लाखो नागरिक घरांमध्ये अडकून पडली आहेत. तेथील वुहान शहरात साताऱ्याच्या आश्विनी पाटील अडकून पडल्या आहेत.
आश्वीनी पाटील यांच्याशी पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला संपर्क पासपोर्ट तेथील कार्यालयामध्ये अडकून पडल्यामुळे त्यांना मायदेशात येता येत नाही. आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आश्विनी पाटील यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून त्यांना मायदेशी आणण्याचे आश्वासनही दिले आहे. यानंतर त्यांनी भारतीय दुतावासाशी संपर्क करून पाटील यांना भारतात आणण्यासाठी व्यवस्था करण्यासंदर्भात चर्चा केली. यासदंर्भात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहे.
संबंधित विभागाशी पृथ्वीराज चव्हाण यांनी संपर्कदेखील साधला आहे. व्हीएफएस ग्लोबल केअर या विभागाच्या ट्विटरवर त्यांनी संपर्क साधला. यावेळी त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. अडकलेल्या नागरिकांना लवकरच माघारी आणण्याची व्यवस्था केली जाईल, असे उत्तर चव्हाण यांना ट्विटरवरुन मिळाले आहे. त्यामुळे आश्वनी पाटील यांच्यासह चीनमध्ये अडकलेल्या ७० जणांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डिसेंबरमध्ये चीनच्या हुबेई प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. चीनबाहेर कोराना विषाणू संसर्गामुळे दोन बळी गेले आहेत. त्यातील एक बळी हाँगकाँगमध्ये आणि दुसरा फिलिपाईन्समध्ये गेला आहे. तसेच २५ देशांमध्ये कोरोना पसरल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
जगभर या विषाणूचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या या आजारवर कोणताही खात्रीशीर इलाज नाही. काही ठिकाणी एचआयव्ही आणि इतर विषाणूजन्य आजारांवर देण्यात येणाऱ्या औषधांचे सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत.