नवी दिल्ली - माजी हवाई दल प्रमुख बी. एस. धानोवा यांनी बालाकोट एअर स्ट्राईकला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रतिक्रिया दिली आहे. 'तुम्ही कोठेही असा, घुसून मारू, असा संदेश पाकिस्तानी दहशतवाद्यांना द्यायचा होता. त्यामुळेच पाकिस्तानात घूसन एअर स्ट्राईक केली, अन्यथा आम्ही भारताच्या भूमीवरूनही हल्ला करू शकलो असतो, असे धानोवा म्हणाले.
बालाकोट येथील पाकिस्तानी दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी २०१९ ला रात्री हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यामध्ये २०० पाकिस्तानी दहशतवादी आणि अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्थ झाल्याचा दावा भारताने केला होता. मात्र, पाकिस्तानने हा दावा फेटाळला होता. या घटनेनंतर दोन्ही देशामध्ये तणाव वाढून हवाई चकमकही झाली होती. तसेच दोन्ही देश युद्धजन्य परिस्थितीला सामोरे गेले होते.