हैदराबाद - राज्यात आज (शनिवार) सर्वाधिक ७ हजार २२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत... महाराष्ट्रातील पुणे स्थित सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही कंपनी ‘अस्ट्राझेनका’ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबर मिळून कोरोनावर लस विकसित करत आहे... उत्तर प्रदेश राज्यात कोरोना चाचण्या कमी होत असल्याचे म्हणत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे... कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेल्या महामारीमुळे देशात 12 कोटी, तर राज्यात सुमारे अडीच कोटी नागरिकांनी रोजगार गमावला आहे... वाचा यासह राज्यातील आणि देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी...
- मुंबई - राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी राज्यात आज (शनिवार) सर्वाधिक ७ हजार २२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून हे आता ५६.५५ टक्के झाले आहे. आतापर्यंत एकूण २ लाख ७ हजार १९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९ हजार २५१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ४८१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा -CORONA UPDATE : महाराष्ट्रात ९ हजार २५१ नवे कोरोनाबाधित.. ७ हजार २२७ रुग्णांना डिस्चार्ज
- नवी दिल्ली -महाराष्ट्रातील पुणे स्थित सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही कंपनी ‘अस्ट्राझेनका’ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबर मिळून कोरोनावर लस विकसित करत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या घेण्यासाठी कंपनीने भारतीय औषध महानियंत्रकांकडे(DCGI) परवानगी मागितल्याचे सुत्रांनी सांगितले. या लसीचे परिणाम सकारात्मक येत असून लवकच पुढच्या टप्प्यातील चाचणी सुरु करण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा -क्लिनिकल ट्रायलसाठी सिरम इन्स्टिट्युटने DCGI कडे मागितली परवानगी
- वॉशिंग्टन डी. सी - भारतातील केरळ आणि कर्नाटक राज्यात लक्षणीय प्रमाणात इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी पसरले असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे. यासंबंधी नुकताच एक अहवाल युएनने जाहीर केला आहे. याबरोबरच अल- कायदा या दहशतवादी संघटनेत 150 ते 200 दहशतवादी भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार या देशातील असून भारतीय उपखंडात हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, असा इशारा अहवालातून दिला आहे.
सविस्तर वाचा -ISIS चे दहशतवादी केरळ आणि कर्नाटकात.. संयुक्त राष्ट्राचा अहवाल
- लखनऊ - उत्तर प्रदेश राज्यात कोरोना चाचण्या कमी होत असल्याचे म्हणत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना चाचण्या कमी होत असल्यावरून त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच 'नो टेस्ट, नो कोरोना' ही पॉलिसी भीतीदायक असल्याचे म्हटले आहे.
सविस्तर वाचा -'नो टेस्ट, नो कोरोना' पॉलिसी भीतीदायक....प्रियंका गांधींचा योगी आदित्यनाथांना टोला
- मुंबई -जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून सर्वजण गेली सहा महिने कोरोना महामारीसोबत झगडत आहेत. उपलब्ध असलेल्या औषधांचा वापर करून रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत. यात त्यांना यशही येत आहे मात्र, तरीही ठोस लस उपलब्ध नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
सविस्तर वाचा -'लस' म्हणजे नेमके काय? जाणून घ्या हाफकीनच्या शास्त्रज्ञांकडून
- मुंबई -कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेल्या महामारीमुळे देशात 12 कोटी, तर राज्यात सुमारे अडीच कोटी नागरिकांनी रोजगार गमावला. यात स्थलांतरीत, विविध खासगी उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील कामगार असल्याचा दावा कामगार संघटनेच्या प्रतिनिधींकडून करण्यात आला आहे, तर दुसरीकडे कोरोनाच्या काळात खासगी क्षेत्रात रोजगार गमावलेल्या नागरिकांची कोणतीही निश्चित आकडेवारी आणि नोंद अद्यापही सरकारकडे नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे हा रोजगार गमावलेल्या नागरिकांचा आकडा याहून अधिक असावा, असाही दावा करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा -चिंताजनक..! कोरोनाच्या काळात सुमारे अडीच कोटी लोकांनी गमावला रोजगार
- मुंबई -राज्यातील कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने पहिली ते बारावीपर्यंतचा 25 टक्के अभ्यासक्रम (पाठ्यक्रम) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएसई आणि इतर केंद्रीय मंडळानेही आपला अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कमी केलेला अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने http://www.maa.ac.in/academic-year-syllabus-2020-2021/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
सविस्तर वाचा -पहिली ते बारावीपर्यंतचा 25 टक्के अभ्यासक्रम होणार कमी; शिक्षण विभागाला उशिरा जाग
- मुंबई - कोरोनाच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीव्हीर व टोसीलीझमॅब या औषधाचा पुरवठा मर्यादित असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या औषधांचा काळाबाजार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनामार्फत संपूर्ण राज्यभरात कारवाया वाढवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विभागाला दिले आहेत.
सविस्तर वाचा -औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी आता धडक कारवाई, राजेंद्र शिंगणेंचे मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांना पत्र
- औरंगाबाद - लातूरला आलेल्या भूकंपावेळी मी मुख्यमंत्री होतो. आपत्ती निवारणासाठी मी लातुरात गेलो होता. मात्र, सध्याचे मुख्यमंत्री कोरोना काळात कुठेही जात नाहीत, असा आरोप होत आहे. मात्र, लातूरच्या भूकंपात आलेलं संकट एका जिल्ह्यापुरते होते. त्यामुळे तिथे मुख्यमंत्री कार्यालय हलवणे शक्य होते. मात्र, आज राज्यात सर्वत्र संकट आहे. त्यामुळे एका ठिकाणी बसून यंत्रणेला कामाला लावणे गरजेचे आहे आणि ते काम मुख्यमंत्री चांगल्या पद्धतीने करत असल्याचे राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. औरंगाबाद येथे त्यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
सविस्तर वाचा -मुख्यमंत्र्यांनी सगळीकडे जाण्याची गरज नाही - शरद पवार
- अहमदनगर - आघाडी सरकारने राज्यातील शेतकरी आणि जनतेची फसवणूक केली असून हे फेकू सरकार आहे. मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात गेला आहे. त्यामुळे त्यांना स्वतः काही निर्णय घेता येत नाही, अशी टीका भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विखे पाटील यांनी आज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज देशमुख यांची ओझर येथे निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सविस्तर वाचा -मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात; आमदार राधाकृष्ण विखे पाटलांची टीका