हैदराबाद -महाराष्ट्रात आज (मंगळवार) कोरोनाचे 5 हजार 134 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात 89 हजार 294 रुग्णांवर उपचार सुरू आहेत... राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या 'त्या' टिकेला उत्तर दिले आहे... अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ असल्याचे सांगत उदय सामंतांनी केंद्राला पत्र लिहिले आहे... ब्राझीलचे पंतप्रधान जैर बोल्सोनारो यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे... काँग्रेस नेत्या आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या सचिव प्रियंका गांधी यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे... यासह राज्यातील आणि देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा...
मुंबई - आज कोरोनाच्या ५१३४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ८९ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ६१ हजार ३११ नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह (१८.६९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३१ हजार ९८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४६३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज २२४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा -राज्यात दिवसभरात 5 हजार 134 नवे कोरोनाबाधित; तर 224 मृत्यू
नागपूर :हत्येचा प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पुन्हा एकदा न्यायालयाने पॅरोल मंजूर केला आहे. गेल्या महिन्यातच तो पॅरोल पूर्ण करून नागपूर कारागृहात परतला होता. त्यावेळी सुद्धा गवळीच्या पॅरोलला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र तिसऱ्यांदा पॅरोलला मुदतवाढ मिळावी या करिता त्याने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तेव्हा न्यायालयाने गवळीचा अर्ज नामंजूर केल्याने तो जून महिन्याच्या सुरुवातीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात परत आला होता. आता पुन्हा त्याने पॅरोलसाठी न्यायालयात अर्ज केला तेव्हा न्यायालयाने त्याचा अर्ज मंजूर करत २८ दिवसांची रजा दिली आहे.
सविस्तर वाचा -अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पुन्हा २८ दिवसांचा पॅरोल मंजूर
पुणे- सरकारवर पवार नाराज आहेत असे विरोधक बोलतात, तसे काहीही नाही. राज्यातील समस्यांवर विचार करतो तसेच चर्चेसाठी मातोश्रीवर गेल्याने कमीपणा वाटत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या टिकेला उत्तर दिले आहे. शरद पवारांना या वयात मातोश्रीवर चकरा माराव्या लागतात हे बरोबर नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याला शरद पवारांनी उत्तर दिले. तसेच चंद्रकांत पाटील यांना चिंता वाटत असेल, मात्र मला मातोश्रीवर जाण्यात कमीपणा वाटत नाही, असे पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
सविस्तर वाचा -चर्चेसाठी मातोश्रीवर गेल्याने कमीपणा वाटत नाही, शरद पवारांचे चंद्रकात पाटलांना प्रत्युत्तर
लंडन :गुरुवारपासून लंडनमध्ये सुरू होत असलेल्या 'इंडिया ग्लोबल वीक २०२०' मध्ये पंतप्रधान मोदी भाषण करणार आहेत. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते जगाला संबोधित करतील. भारतातील व्यापार आणि परराष्ट्र गुंतवणूकीसंबंधी विषयावर ते भर देणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, रेल्वे मंत्री पियुष गोयल, नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद आणि कौशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे यांचीही भाषणे या परिषदेमध्ये होणार आहेत.
सविस्तर वाचा -'इंडिया ग्लोबल वीक २०२०' : पंतप्रधान मोदी जगाला करणार संबोधित..
मुंबई- राज्यातील कायदा व सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.