मुंबई- ब्रिटिशांनी आपल्याला दिलेला एक मोठा वारसा, जो देशातील बहुतांश लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे, तो म्हणजे चहा! आपल्या सर्वांच्या ओळखीत कोणी ना कोणी 'टी लव्हर' असतोच. मात्र या चहाचे उत्पादन घेताना त्यावर केमिकलयुक्त कीटकनाशके तर फवारली जात नाहीत ना..? तसेच सध्या सरकारने विविध प्रकारच्या कीटकनाशकांवर बंदी आणली आहेत, त्याचा चहाच्या उत्पादनावर काय परिणाम होतोय..? या सारख्या विविध प्रश्नासंबंधी 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट...
देशभरात हल्ली सेंद्रीय चहाला मोठ्या प्रमाणात मागणी होताना दिसत आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, विशेषत: दार्जिलिंगमध्ये चहाचे उत्पादन हे सेंद्रिय पद्धतीने घेण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करुन घेतलेले चहाचे उत्पादन, हा चहा उत्पादकांचा नवीन मंत्रच बनला आहे.
चहाची रोपे लावताना रोपांवर पडणारा रोग आणि किटकांचा प्रादुर्भाव हे चहा उत्पादकांसमोरील सर्वात मोठे संकट आहे. चांगल्या प्रमाणातील पाऊस हा पिकावरील रोगाला दूर ठेवून उत्तम उत्पादन देण्यास मदत करतो. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कीटक नाशकांचा वापर केला जातो. मात्र नुकतेच केंद्र सरकारने कीह कीटकनाशकांवर बंदी आणली आहे. त्यामुळे सेंद्रिय चहाची शेती सध्या वरदान ठरत आहे.