मुंबई -२६ नोव्हेंबर २०१९ला आपली राज्यघटना स्वीकारून ७० वर्षे पूर्ण होतील. याच दिवशी, १९४९ला भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला होता. या घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी, चार वर्षांपूर्वी (२०१५) पासून सरकारने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले. याच निमित्ताने 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची विशेष मुलाखत घेतली आहे.
वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू. भारतीय संविधान दिनानिमित्त, ईटीव्ही भारतशी बोलताना प्रकाश यांनी म्हटले, की बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणामुळेच असे संविधान लिहिले गेले, जे आज ७० वर्षांनंतरही लागू होत आहे. आजच्या पिढीशी आणि मागील पिढीशीही ते समरूप होते आहे. आजच्या पिढीच्या समस्यांना न्याय, आणि त्यांना आपले मत मांडण्याचा हक्क देते आहे.
यासोबतच, गेल्या 70 वर्षांत अनेक वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली. या घटनेत एकाही घटना दुरुस्तीची काहीही गरज नव्हती राज्यकर्त्यांचे अपयश लपवण्यासाठी या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या, अशी खंत देखील प्रकाश आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केली. घटना बदलून 'जीएसटी' आणली, उद्या 'जीएसटी' बदलायची आहे परत घटना बदलावी लागेल असेही आंबेडकर उपहासाने म्हणाले.