नवी दिल्ली- गेल्या चार दशकांहून अधिक काळ निष्पक्ष पत्रकारिता करणाऱ्या समूहातर्फे हा पुरस्कार स्वीकारणे, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. आपल्या देशात अनेक अशा घटना होतात, ज्या कधीच प्रकाशात येत नाहीत. अतिशय दुर्गम भागातील लोकही काहीतरी मोठे काम करून आपला ठसा उमटवतात. या लोकांना प्रकाशात आणण्याचे काम आम्ही करत आहोत, असे मत 'ईटीव्ही भारत'च्या संचालिका बृहती चेरुकुरी यांनी व्यक्त केले. त्या दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलत होत्या.
'"ईटीव्ही भारत" म्हणजे असे व्यासपीठ, जिथे प्रत्येक भारतीयाला जागा मिळते..' 'ईटीव्ही भारत'ला दक्षिण आशियातील 'सर्वोत्तम डिजिटल न्यूज स्टार्टअप पुरस्कार' मिळाला. डिजीटल मीडियामध्ये नाविन्यपूर्ण स्टार्टअपची सुरुवात केल्यामुळे 'ईटीव्ही भारत'ला गौरवण्यात आले. 'वर्ल्ड असोशिएशन ऑफ न्यूज पेपर अॅड न्यूज पब्लिशर'(WAN IFRA) या संस्थेद्वारे हा पुरस्कार देण्यात आला. 'ईटीव्ही भारत'च्या व्यवस्थापकीय संचालिका बृहती चेरुकुरी यांनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारला.
यावेळी बोलताना त्यांनी ईटीव्ही भारतच्या कामाबाबत माहिती दिली. देशातील प्रत्येक नागरिकाला एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे ईटीव्ही भारत करत असल्याचे त्यांनी सांगितले. उदाहरण द्यायचे झाल्यास, कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील एक आई, दररोज आपल्या दिव्यांग मुलाला उचलून घेऊन, चार किलोमीटर दूर असलेल्या शाळेत सोडवत होती. आम्ही जेव्हा याबाबत बातमी केली, तेव्हा स्थानिक प्रशासानाने त्यांची दखल घेत, त्या मुलाच्या प्रवासाची व्यवस्था केली. ही घटना छोटी वाटत असली, तरी त्याची आई आणि मुलाच्या जीवनावर यामुळे मोठा प्रभाव झाला आहे. या घटनांना, या लोकांना एक व्यासपीठ मिळणे गरजेचे होते. एक खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असे व्यासपीठ, जिथे प्रत्येक भारतीय नागरिकाला जागा मिळेल. त्यामुळे, २१ मार्च २०१९ला आम्ही 'ईटीव्ही भारत'ची स्थापना केली.
कोल्हापूरच्या 'दंगल गर्ल'चा केला उल्लेख..
'ईटीव्ही भारत'ने केलेल्या विशेष बातम्यांचा उल्लेख करत असताना, बृहती यांनी कोल्हापूरची 'दंगल गर्ल' शिवानी मेटकर हिचा आवर्जून उल्लेख केला. कोल्हापूरजवळील एका खेडेगावातून आलेल्या शिवानीने नुकतेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिचा एकूण प्रवास हा इतरांना प्रेरणा देण्यासाठी जगापुढे मांडणे आवश्यक होते, असे मत बृहती यांनी व्यक्त केले.