नवी दिल्ली - अंतिम वर्ष परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, मात्र परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विविध राज्यांमधून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. जेईई, नीट २०२० च्या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. या परीक्षांसाठी लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांची प्रवेशपत्रे यापूर्वीच डाऊनलोड केली आहेत. यावरून विद्यार्थी परीक्षा देण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.
बिगरभाजप जवळपास सहा राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. मात्र, ईटीव्ही भारतकडून विद्यार्थ्यांचे मत लक्षात घेतले असता अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा होणे गरजेचे असून आम्ही परीक्षेची तयारी केली असल्याचे सांगितले आहे.
ईटीव्ही भारतशी बोलताना मो. अफसर अली म्हणाले, कोरोनाचा विचार करता 'एनटीए'ने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. आम्ही परीक्षेसाठी बरीच तयारी केली आहे आणि ही चांगली बातमी आहे की, आमच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.