नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घोषणा केली, की देशात अन्नधान्याचा तसेच अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, असे ते म्हणाले.
देशाचा गृहमंत्री म्हणून मी लोकांना याची खात्री देतो, की आपल्याकडे अन्न, औषध आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी काळजी करू नये. अशा आशयाचे ट्विट शाह यांनी केले. यासोबतच आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी नागरिकांना गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
आता आपल्याला याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, की सर्व नागरिक लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करत आहेत, तसेच कोणालाही गरजेच्या वस्तूंचा तुटवडा भासत नाहीये. यावेळी राज्य सरकार, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस व सुरक्षा कर्मचारी हे सर्व अगदी प्रशंसनीय काम करत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कोरोनाची झळ आपल्याला तितकीशी बसत नाहीये. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करुन या सर्वांना सहकार्य करावे. असेही ते पुढे म्हटले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यामध्ये त्यांनी देशातील लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची घोषणा केली. देशात सुरू असलेला लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :देशातील लॉकडाऊन कालावधी ३ मे पर्यंत वाढवला; पंतप्रधान मोदींची घोषणा..