नवी दिल्ली -भारत सरकारच्या 'फिट इंडिया' कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनोखी शक्कल लढवली आहे. दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकात 'स्क्वाट मशीन' बसवण्यात आले आहे. या मशीनवर एका विशिष्ट पद्धतीने उभे राहून बैठका काढल्यास प्लॅटफॉर्म तिकीट मोफत मिळते.
रेल्वे मंत्रालयाकडून याबाबत ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. 'हम फिट, तो इंडिया फिट, एक्सरसाइज से हों फिट, मुफ्त मिले प्लेटफार्म टिकिट' असे कॅप्शन देऊन ट्विट करत कशा पद्धतीने मशीनवर व्यायाम केल्यानंतर तिकीट मिळते, हे दाखवणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा बैठका काढताना दिसतो. बैठका काढल्यानंतर मशीनमधून आपोआप प्लॅटफॉर्म तिकीट खाली पडते.
यासाठीचा नियमही सांगण्यात आला आहे. मोफत तिकीट मिळवण्यासाठी तुम्हाला १८० सेंकदात ३० बैठका माराव्या लागणार आहेत. प्रवाशांचा व्यायाम आणि मनोरंजनही व्हावे असा या पाठीमागचा उद्देश आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून उच्च शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी 'फिट इंडिया' मोहीम सुरू करण्यात आली आहे.