मंगळुरू- कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातल्या एका इंजिनिअरने वाढत्या प्लास्टिक कचऱ्याविरोधात युद्ध पुकारले आहे. व्यवसायाने इंजिनिअर असलेले वीरप्पा आरकेरी घरोघरी जाऊन प्लास्टिक कचरा गोळा करतात. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या धोक्यांपासून ते लोकांमध्ये जनजागृती करत आहेत.
वीरप्पा कॉम्प्युटर आणि शिवनकाम प्रशिक्षकाचे कामही करतात. लोकांकडून जमा केलेल्या प्लास्टिकचे पैसे देता यावेत हा उद्देश समोर ठेवून ते एकावेळी अनेक काम करतात.
हेही वाचा -नो टू सिंगल यूज प्लास्टिक : अन्य राज्यांसाठी मॉडेल बनत आहे अंबिकापूर 'कचरा व्यवस्थापन'
ईटीव्ही भारतशी बोलताना वीरप्पा म्हणाले की, प्लास्टिक कचरा आज आपल्यासाठी मोठी समस्या बनली आहे. जर आपण याकडे लक्ष दिले नाही, तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांची काय अवस्था होईल? त्यामुळे मी प्लास्टिक कचरा गोळा करण्याच काम सुरू केले आहे. हे काम मी मागील पाच वर्षांपासून करत आहे. या कामासाठी हुबळीतील धारवाड येथील महिला मला मदत करतात.
या कामाची सुरुवात करणे वीरप्पा यांच्यासाठी सोप्पे नव्हते. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लोकांनी त्यांना प्लास्टिक मोहिमेत सहकार्य करण्यास नकार दिला. मात्र, वीरप्पा यांनी हार मानली नाही, जो निर्धार मनाशी केला होता, त्यावर काम करत राहीले. हळूहळू जसे त्यांच्या कामाला यश आल तसे लोक त्यांच्या कामाशी जोडले गेले. आणि प्लास्टिक विरोधी अभियानात सहभागी झाले.