नवी दिल्ली: निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एक महिन्यापूर्वी त्यांची एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) उपाध्यक्ष पदी निवड झाली होती. त्यानंतर, आज (मंगळवार) त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यांनी आपल्याला ३१ ऑगस्टला पदमुक्त करावे, अशी मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देशाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा हे २०२१च्या एप्रिलमध्ये सेवानिवृत्त होतील. त्यानंतर लवासा हे मुख्य निवडणूक आयुक्त होणार होते. मात्र, यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा देणारे ते दुसरे निवडणूक आयुक्त आहेत.