लखनौ -पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढणारे समाजवादी पक्षाचे उमेदवार आणि बडतर्फ बीएसएफ सैनिक तेज बहादुर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो. यासाठी निवडणूक आयोगाने त्यांना एक नोटीस पाठवली आहे. २४ तासाच्या आत त्यांनी नोटीसमध्ये नमूद प्रमाणपत्र जमा न केल्यास त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो.
सोमवारी तेज बहादुर यादव यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आयोगाने बीएसएफ प्रशासनाकडून निवडणूक लढण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याची नोटीस तेज बहादुरला पाठवली आहे. बीएसएफमधून कोणत्या आधारावर बडतर्फ करण्यात आले होते. याबद्दल त्यामध्ये स्पष्टीकरण असावे, अशी ताकीदही आयोगाने नोटीसात सुनावली आहे.
तेज बाहादुर यादव यांना हे प्रमाणपत्र १ मेला सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्हाध्यक्ष कार्यालयात जमा करणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज वैध किंवा अवैध हे ठरवण्यात येईल. मी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढू नये म्हणून सरकारी तंत्राचा अवैधरित्या वापर करण्यात येत आहे, असा आरोप तेज बहादुर यांनी लावला आहे.