नवी दिल्ली -दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या एक दिवसापूर्वीच निवडणूक आयोगाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे. अरविंद केजरीवाल यांनी 3 फेब्रुवारीला एक व्हिडिओ टि्वटरवर शेअर केला होता. त्या व्हिडिओमुळे आदर्श आचारसंहितचे उल्लघंन झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने तक्रार दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाने नोटीस जारी केली. केजरीवाल यांनी 3 फेब्रुवारीला एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये हिंदू-मुस्लीम आणि मंदिर-मशीद या शब्दांचा बऱ्याचवेळा उल्लेख केला आहे. त्यामुळे सांप्रदायिक सद्भाव आणि सामाजिक शांतता बिघडू शकते. या व्हिडिओमध्ये केजरीवाल हे धार्माच्या आधारे मत मागत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे आदर्श आचारसंहितचे उल्लघंन झाले असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. शनिवारी सांयकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने त्यांना उत्तर मागितले आहे.
यापूर्वीही केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. मला संधी मिळाली तर न्यायालय परिसरात मोहल्ला क्लिनिक सुरू करेन, असे वक्तव्य केजरीवाल यांनी वकिलांच्या संमेलनाला संबोधित करताना केले होते. दरम्यान, 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असून 11 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.