भुवनेश्वर :ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वृद्ध दाम्पत्याला जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन जिवंत जाळण्यात आले आहे. जिल्ह्याच्या सुरी साही गावामध्ये हा प्रकार घडला. बसंती बालमूच आणि कैलास बालमूच असे या दाम्पत्याचे नाव होते.
यासंदर्भात कलिंगा नगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत अशी माहिती जाजपूर पोलीस अधीक्षक चरण सिंह मीरा यांनी दिली. यासंदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल आणि दोषींना कडक शिक्षा देण्यात येईल असेही ते म्हणाले.
धक्कादायक! जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन वृद्ध दाम्पत्याला जिवंत जाळले.. यापूर्वी, १५ जूनलाही एका व्यक्तीने ६० वर्षीय वृद्धेचा गळा चिरून तिची हत्या केली होती. ती जादूटोणा करते, आणि तिच्यामुळे आपल्या मुलाचा जीव गेला अशा संशयातून त्याने हे कृत्य केले होते. यानंतर तिचे शिर घेऊन पोलीस ठाण्यात जात त्याने आत्मसमर्पण केले होते.
विशेष म्हणजे बिहार, छत्तीसगड आणि झारखंडनंतर जादूटोणा विरोधी कायदा लागू करणारे ओडिशा चौथे राज्य आहे. २०१३मध्येच राज्य सरकारने जादूटोणा करणाऱ्या लोकांची हत्या (प्रतिबंध) कायदा लागू केला होता. मात्र तरीही अशा प्रकारच्या घटना होतच आहेत. राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये अजूनही दरवर्षी अंधश्रद्धेमुळे कित्येकांचा बळी जातो आहे.
हेही वाचा :आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशातील पुरग्रस्तांना मदत करा; प्रियंका गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन