नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यानंतर त्यांच्या एका मंत्र्याने भारताला धमकावले होते. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. त्यांना लंडनमध्ये अज्ञातांनी मारहाण केली असून त्यांच्यावर अंडीसुद्धा फेकून मारली आहेत.
भारताने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानासह त्यांच्या मंत्र्यानीही भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. त्यांना आपल्या कर्माचे फळ मिळाले असून लंडनमध्ये त्यांनी लाथाबुक्यांनी मार खाल्ला आहे.
पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर पीपीपीचे कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शेख रशीद यांच्यावर अंडी फेकली असून या घटनेचा व्हिडिओसुद्धा ट्विटरवरून पोस्ट केला आहे. तर पीपल्स यूथ ऑर्गनायझेशन युरोपचा अध्यक्ष असलेल्या असिफ अली खान आणि महिला शाखेच्या अध्यक्ष समा नमाज यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
यापूर्वी त्यांनी भारताला पाकिस्तानकडे वाईट नजरेने पाहिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला होता. ‘पाकिस्तानकडे डोळे वटारुन पाहिलं तर त्याचे डोळे बाहेर काढू. यानंतर ना चिमण्यांचा चिवचिवाट होईल, ना मंदिरातील घंटा वाजतील’. आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. आमच्यासाठी पाकिस्तानच जीवन आणि पाकिस्तानच मृत्यू असल्याचे म्हटले होते.