अलाप्पुझा -केरळला 2018 मध्ये 'न भूतो न भविष्यति' अशा पूरस्थितीचा सामना करावा लागला होता. अनेक लोक बेघर झाली होती. पुराने हाहाकार माजवल्यानंतर विस्थापित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी ईनाडू-रामोजी समुहाने हात पुढे केला. या मोहिमेंतर्गत अलाप्पुझा येथील विस्थापितांना तब्बल 121 घरे बांधून दिली आहेत. त्यांच्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.
'आय अॅम फॉर अल्लेप्पी' : केरळमधील पूरग्रस्तांना रामोजी समुहाने 121 घरे दिली बांधून
केरळमधील पूरग्रस्तांसाठी केरळ सरकारच्या गृहनिर्माण प्रकल्पांव्यतिरिक्त हा दुसरा सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प आहे. रविवारी लाभार्थ्यांना घराच्या चाव्या सोपवण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदत होती. मात्र, हा प्रकल्प अवघ्या आठ महिन्यांत पूर्ण झाला आहे. अलाप्पुझाचे माजी उपजिल्हाधिकारी व्ही. आर. कृष्णा तेजा यांनी या प्रकल्पासाठी जमिनीची निवड करण्यापासून ते बांधकाम पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण काम पाहिले.
प्रकल्पात बांधण्यात आलेल्या घरांचा तळमजला जमिनीपासून दीड मीटर उंच ठेवण्यात आला आहे. जेणेकरून त्यांना पुन्हा पूर परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही. अलाप्पुझामधील घरे बांधण्यासाठी अनेक बांधकाम तज्ञांनी हेच मॉडेल अवलंबले आहे.
कुदुंबश्री महिला बांधकाम शाखेकडे ही घरे बांधण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्यांनी साहित्याच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता अत्यंत कमी खर्चात विक्रमी काम केले आहे. प्रारंभिक योजना 116 घरे बांधण्यासाठी होती. मात्र, कुदुंबश्री सदस्यांनी प्रत्येक घराची किंमत कमी केली आणि त्यातच आणखी पाच घरे बांधली.
संपूर्ण प्रकल्प 7 कोटी 77 लाखांमध्ये पूर्ण झाला. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विनंतीवरून या बांधकामासाठी कुदुंबश्री बांधकाम शाखेची निवड करण्यात आली होती.
या प्रकल्पासाठी ईनाडू-रामोजी समूहाने जगभरातील वाचकांकडून आणि रामोजी समुहामधील कर्मचाऱ्यांकडून पूर मदत निधी गोळा केला होता.यापूर्वी देखील ईनाडू-रामोजी समुहाने असे अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. गुजरातमधील कच्छ येथील भूकंप, ओडीसामधील चक्रीवादळ, तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात आलेली सुनामी, कृष्णा व गोदावरी नद्यांना आलेला पूर अश्या अनेक संकटामध्ये रामोजी समूहाने मदत केली होती. रामोजी समुहाचा हा दहावा प्रकल्प आहे.
मुख्यमंत्री पिनाराई विजयन अलाप्पुझा येथील पाथिरपल्ली येथे होणाऱया कार्यक्रमात लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सोपवणार आहेत. या कार्यक्रमामध्ये ईनाडूचे व्यवस्थापकीय संचालक सी.एच किरण, मार्गदर्शी चिट फंडाचे व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण, केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक तसेच राज्यातील प्रमुख राजकीय नेते आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी या समारंभात भाग घेणार आहेत.