पाटणा -बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात नवीन सरकार स्थापन झाले आहे. नितीश सरकारमध्ये शिक्षणमंत्री झालेले डॉ. मेवालाल चौधरी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतल्यानंतर मेवालालाल चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या राजीनाम्याचा लिफाफा राजभवनात पोहोचला आहे. डॉ. मेवालालाल चौधरी यांनी राजीनामा दिल्यानंतर जेडीयूचे प्रवक्ते अजय आलोक यांनी आरजेडीवर जोरदार हल्ला केला. माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि तेजस्वी यादव राजीनामा कधी देतील. त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप आहे, असे ते म्हणाले.
नितीश कुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना मंगळवारी विविध विभागांचे वाटप केले होते. यात मेवालाल चौधरी यांनी मंगळवारी शिक्षण खाते सोपवण्यात आले होते. शिक्षणखात्याचा मेवालाल चौधरी यांनी आज पदभार स्वीकारला होता. मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर विरोधीपक्षांकडून आरोप लावण्यात आले. आरोप लावणाऱ्याविरोधात आपण मानहाणीचा खटला दाखल करू असेही मेवालाल म्हणाले होते. मात्र, अचानक त्यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मेवालाल हे 72 तासही मंत्री राहिले नाहीत. तर शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार अशोक चौधरी यांना सोपवला आहे.