नवी दिल्ली -वरिष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांची सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) मनी लाँड्रींग प्रकरणी तिसऱ्यांदा चौकशी सुरु केली आहे. संदेरसा ब्रदर्स बँक घोटाळा आणि मनी लाँड्रीग प्रकरणी पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज(गुरुवारी) ईडीने त्यांच्या निवासस्थानी चौकशी केली.
ईडीचे तीन सदस्यीय पथक दिल्लीतील ल्युटेयन्स भागातील पटेल यांच्या निवासस्थानी सकाळी 11 वाजता पोहचले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईडीच्या कार्यालयात येण्यास अहमद पटेल यांनी नकार दिला होता. त्यामुळे घरीच चौकशी करण्यासाठी अधिकारी पोहचले.
वडोदरा येथील स्टर्लिंग बायोटेक कंपनीचे प्रमोटर्स, संदेसरा बँक अहमद पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांचे काय संबध आहेत, यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. मागील वर्षी ईडीने पटेल यांचा मुलगा फैजल पटेल आणि जावई इरफान अहमद सिद्दीकी यांची चौकशी केली होती. स्टर्लिंग बायोटेक कंपनीने 14 हजार 500 कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील अनेक आरोपी फरार आहेत.
'सरकारने पाठवलेल्या पाहुण्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. मला आश्चर्य वाटतयं की, चीन, कोरोना, बेरोजगारीबरोबर लढायचे सोडून सरकार विरोधी पक्षांबरोबर लढत आहे', असे वक्तव्य अहमद पटेल यांनी शनिवारी चौकशीनंतर केले होते.