नवी दिल्ली- फरार स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंद याची इक्वाडोर येथील स्वतंत्र राष्ट्रस्थापनेची बातमी या देशाच्या भारतातील दूतावासाने फेटाळून लावली आहे. नित्यानंद हैती या देशात वास्तव्यास असल्याचा अंदाज दूतावासाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
बलात्कार प्रकरणातील आरोपी नित्यानंद याने गेल्यावर्षी नेपाळमार्गे भारतातून पळ काढला होता. यानंतर त्याने इक्वाडोर देशात आश्रय मिळवून तेथे स्वतःचे ‘सार्वभौम हिंदू राष्ट्र’स्थापन केले आहे, अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. इक्वाडोरने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, 'स्वयंघोषित गुरू नित्यानंद याला इक्वाडोरने आश्रय दिला आहे किंवा इक्वाडोर सरकारने त्याला दक्षिण अमेरिकेजवळ किंवा इक्वाडोरच्या आसपास भूखंड खरेदी करण्यासाठी मदत केली आहे, अशा स्वरुपाच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांना इक्वाडोर दूतावासाची मान्यता नाही.'
'नित्यानंद यांनी इक्वाडोरकडे आंतरराष्ट्रीय वैयक्तिक संरक्षणाची (आश्रय) मागणी केली होती. ही मागणी इक्वाडोरने नाकारली होती. यानंतर त्यांनी कदाचित हैती देशात जाण्यासाठी इक्वाडोर सोडले असावे,'असेही यात म्हटले आहे. त्याचप्रमाणे या वादग्रस्त गुरूसंदर्भातील बातम्यांमध्ये आपल्या देशाचा उल्लेख टाळण्याचे आवाहन करताना इक्वाडोर दूतावासाने म्हटले आहे, की 'सर्व मुद्रित आणि वेब माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना नित्यानंद किंवा त्यांच्या लोकांमार्फत चालविल्या जाणाऱ्या संकेतस्थळावरील माहितीचा आधार घेण्यात आला आहे. यापुढे सर्व माध्यम संस्थांनी नित्यानंद यांच्यासंदर्भातील कोणत्याही बातमीत इक्वाडोरचा उल्लेख करू नये.'