कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानदरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने राहिलेल्या पुढील ३ टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव दलाची नियुक्ती करण्याच्या निर्णय घेतला आहे.
पश्चिम बंगालमध्ये बहरामपूर, रानाघाट, कृष्णनगर, बर्दवान पूर्व, बर्दवान-दुर्गापूर, आसनसोल, बोलपूर आणि बिरभूम या आठ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेवेळी काही ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत झाले. मात्र, पुढील टप्प्यातील निवडणूकीत केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षा मतदान केंद्रावर ठेवली जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आरिज आफताब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पुढील मतदानाच्या टप्प्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या ५८० पथके नेमण्यात येणार आहेत.
बीरभूम जिल्ह्यामधील नलहाटी शहरामध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीत एका भाजप कार्यकर्ता जखमी झाला. तर आसनसोल मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या भांडणामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.