नवी दिल्ली - 'इबोला' विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वापरण्यात आलेले 'रेमडेसिविर' हे औषध कदाचित कोरोनाचाही प्रसार रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने व्यक्त केले आहे. कोविड-१९ ला कारण ठरणाऱ्या सार्स-कोव-२ या विषाणूच्या वाढीला आळा घालण्यासाठी या औषधाचा उपयोग होऊ शकतो, असे परिषदने म्हटले आहे.
'न्यू इंग्लंड जरनल ऑफ मेडिसिन' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. कोरोनाच्या तीनपैकी दोन अतिगंभीर रुग्णांनी - जे व्हेंटिलेटरवर होते -रेमडेसिविर या औषधाला चांगला प्रतिसाद दिला. या औषधाच्या वापरानंतर त्यांच्यामध्ये होत असलेल्या विषाणूची वाढ थांबल्याचे दिसून आले. या संशोधनाचा दाखला देत, वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख आर. गंगाखेडकर यांनी सांगितले, की याच औषधाचा वापर करून आपण कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करु शकतो.