नवी दिल्ली - शहरातील एनसीआर परिसरात रात्री साडेदहाच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता ३.२ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र दक्षिण पूर्व नोएडात नोंदवण्यात आले.
भूकंपामुळे झाली नाही कोणतीही हानी
भूकंपाचे हादरे बसल्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. मात्र या भूकंपात कोणतेही नुकसान झाल्याची माहिती अद्यापही हाती आली नाही. भूकंपाचे केंद्र दिल्लीतील नोएडा परिसरात असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
दीड महिन्यात तब्बल ११ वेळा हादरली दिल्ली
गेल्या दीड महिन्यात दिल्ली परिसरात तब्बल ११ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. यातील जास्तीत जास्त भूकंप कमी तिव्रतेचे असल्याने त्यांचे धक्के जाणवले नाहीत. तरीही तब्बल ११ वेळा दिल्ली हादरल्याने नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.