नवी दिल्ली - मानवी तस्करीबाबत दिल्लीच्या महिला आयोगाने आज एक मोठी कारवाई केली आहे. तब्बल ४५ अल्पवयीन मुलींची तस्करी रोखण्यात आयोगाला यश मिळाले आहे. या सर्व मुली झारखंडच्या होत्या. त्यांना विमानाने आपल्या राज्यात सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना सोरेन यांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांचे कौतुक करत आभार मानले आहेत.
आयोगातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात झारखंडच्या कित्येक मुलींना दिल्लीच्या विविध भागांतून वाचवण्यात आले होते. नोकरीच्या आमिषाने या मुलींना दिल्लीला आणले जात, आणि विविध भागांमध्ये त्यांची विक्री केली जात होती. या घटना समोर आल्यानंतर झारखंडच्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती देण्यात आली होती. वाचवण्यात आलेल्या मुलींना लवकरात लवकर झारखंडला परत पाठवत असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सोरेन यांना सांगितले होते. यानंतर या मुली आता सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचल्या आहेत.