नवी दिल्ली -जननायक जनता पक्षाचे प्रमुख दुष्यंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला यांचा फर्लो अर्ज मंजूर झाला आहे. त्यांना दोन आठवड्यासाठी तुरुंगातून रजा मिळाली आहे. अजय चौटाला हे हरियाणामधील शिक्षक भर्ती घोटाळ्याप्रकरणी तिहार तरुंगात होते.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत जेजेपीने 10 जागांवर विजय मिळवला आहे. निवडणूक जिंकल्यानंतर तिहार तुरुंगात बंद असलेले वडील अजय चौटाला यांना दुष्यंत यांनी भेट दिली. राज्यात जेजेपी आणि भाजप सरकार स्थापन करणार आहे. भाजपचा मुख्यमंत्री तर जेजेजीपचा उपमुख्यमंत्री असणार आहे. दरम्यान वडिलांना फर्लो रजा मिळाल्यामुळे दुष्यंत चौटाला यांनी आनंद व्यक्त केला आहे.
काय होता शिक्षक घोटाळा ?
हरियाणात १९९९-२००० मध्ये ओमप्रकाश चौटाला यांची सत्ता असताना हा घोटाळा झाला होता. चौटाला पितापुत्रांनी सत्तेचा दुरुपयोग करीत मूळ गुणवत्ता यादी डावलून लाच घेऊन ३२०८ कनिष्ठ शिक्षकांची मनमानी पद्धतीने भरती केल्याचा आरोप होता. तत्कालीन प्राथमिक शिक्षण संचालक संजीव कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निवड करण्यात आलेल्या शिक्षकांच्या यादीत फेरबदल करण्यासाठी चौटाला दबाव आणत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात दोषींमध्ये संजीव कुमार यांचाही समावेश आहे.
काय असते फर्लो रजा?
जर एखाद्या दोषीने आपल्या शिक्षेच्या अर्ध्यापेक्षा जास्त शिक्षा भोगली असेल तर त्याला वर्षामध्ये चार आठवडे फर्लो दिला जाऊ शकतो. तुरुंगातील कैद्यांच्या सहवासातून काही दिवस कौटुंबिक वातावरणात राहता यावे आणि सामाजिक संबंध राखता यावेत यासाठी 'फर्लो' दिली जाते. फर्लोला संचित रजा असे म्हटले जाते. गुन्हेगारास एकाच वेळी 2 आठवडे एवढा फर्लो दिले जाऊ शकतो. फर्लो मिळवने हा गुन्हेगाराचा हक्क आहे.