पाटणा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. पण, अत्यावश्यक सेवेत येणारी रुग्णवाहिकाच न मिळाल्यामुळे एका तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. बिहारच्या जहानाबादच्या शासकीय रुग्णालयात वेळेवर न पोहोचल्याने या मुलाचा मृत्यू झाला आहे. शासकीय रुग्णालयाकडून वेळेत रुग्णवाहिका न पाठवल्यामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या पित्याने केला आहे. इतकेच नाही तर मृत्यूनंतर मृतदेह घरी नेण्यासाठीही प्रशासनाने रुग्णवाहीका किंवा शववाहिका उपलब्ध करुन दिली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हृदयद्रावक..! रुग्णवाहिका न मिळाल्याने तीन वर्षीय चिमुरड्याचा अंत अरवल येथील कुर्था पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहपूर येथील रहिवासी गिरजेश कुमार यांच्या तीन वर्षीय मुलाची प्रकृती अचानक बिघडली. गिरजेश यांनी उपचारसाठी त्याला घेऊन अरवल येथील शासकीय रुग्णालयात पोहोचले. प्रकृती आणखी खालावल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला जहानाबाद येथील रुग्णालयात पाठवले. त्याच्या आई-वडिलांना त्याला जहानाबाद शासकीय रुग्णालात घेऊन गेले. पण, मुलाची प्रकृती पाहून तेथील डॉक्टरांनी त्याना पाटणाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपाचारासाठी नेण्याचा सल्ला दिला.
पित्याचा आरोप - रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली नाही
मृत मुलाच्या पित्याने जहानाबाद शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनावर आरोप केले की, येथील उपचारानंतर पाटणाला उपचारासाठी सुचविले. पण, रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली नाही. जर येथील रुग्णालय प्रशासनाने वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असती तर आम्ही वेळेत रुग्णालयात पोहोचलो असतो आणि मुलाचा जीव वाचला असता, असेही त्याचे वडिल गिरजेश यांनी सांगितले.
स्थानीय लोकांच्या मदतीने चिमुरड्याच्या मृतदेह घेऊन पोहोलचे गावी
मृत मुलाचे वडिल गिरजेश कुमार सांगितले की, संचारबंदीमुळे त्यांना खासगी वाहनही मिळाले नाही. त्यात रुग्णालय प्रशासनानेही रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली नाही. यामुळे चिमुरड्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे मृतदेह नेण्याचीही रुग्णालय प्रशासनाने मदत केली नसल्याचा आरोपही गिरजेश यांनी केले आहे. त्यानंतर स्थानीय लोकांच्या मदतीने मृतदेह घेऊन ते त्यांच्या गावी शाहपुरात पोहचले.
दोषींवर कारवाई करणार - जिल्हाधिकारी
याबाबात जिल्हाधिकारी नवीन कुमार यांना विचारले असता, त्यांनी घटनेची चौकशी करुन जो दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.