नवी दिल्ली - लॉकडाऊन दरम्यान दिल्ली-एनसीआरमध्ये अचानक गांजा-अफूची मागणी वाढली. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) या कारणामागील एक मोठा खुलासा केला आहे. लॉकडाऊनमुळे देशात कोकेन आणि हेरोइनचा पुरवठा जवळजवळ बंद झाला होता. यामुळे अंमली पदार्थ सेवन करणार्यांमध्ये गांजा व अफूची मागणी वाढली आणि त्याची तस्करी अधिक दिसून आल्याचे 'एनसीबी'ने सांगितले आहे. लॉकडाऊनकाळत एनसीबीने तस्करांकडून तब्बल 400 किलो अफू आणि 2 हजार किलो गांजा जप्त केला आहे.
हवाई मार्गाने अंमली पदार्थांची तस्करी -
एनसीबीचे विभागीय संचालक केपीएस मल्होत्रा म्हणाले, की कोकेन आणि हेरोइन तस्करीसाठी सर्वाधिक हवाई मार्गाचा वापर केला जातो. लॉकडाऊन दरम्यान हवाई मार्ग बंद झाल्यामुळे ही दोन्ही पदार्ध भारतात येत नव्हती. जरी आली तरी तो जुना स्टॉक होता. जेव्हा ड्रग यूजर्सना कोकेन-हेरोइन मिळत नाही तेव्हा त्यांनी गांजा आणि अफूचे व्यसन होऊ लागले. यामुळे त्यांची मागणी वेगाने वाढली असल्याचे एनसीबीने सांगितले आहे.
'कर्फ्यू' पासचा गैरवापर करत तस्करी -
विभागीय संचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान ट्रकला रेशन, फळे, भाज्या इत्यादी वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी कर्फ्यू पास देण्यात येत होते. तस्करांनी याचा वापर गांजा व अफूच्या तस्करीसाठी केला. फळे आणि भाज्यांच्या पोत्यांमध्ये गांजा आणि अफूची तस्करी करण्यास सुरुवात झाली. एका ठिकाणी एनसीबीने ट्रकच्या टायरमधून अफू जप्त केला होता. अहमदाबाद, राजस्थान व लखनऊ याठिकाणीसुद्धा कर्फ्यू पासचा गैरवापर करत अंमली पदार्धांची तस्करी करणरे अनेक ट्रक जप्त करण्यात आले आहेत.