हैदराबाद : कोरोना उपचारावर प्रभावी असणाऱ्या रेमडेसिव्हिर औषधाच्या निर्मितीसाठी तेलंगाणामधील हेटेरो कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. 'ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'ने या कंपनीला रेमडेसिव्हिरचे उत्पादन आणि विक्री करण्याची परवानगी दिली आहे.
हेटेरो कंपनी 'कोव्हिफोर' नावाने या औषधाची विक्री करणार आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर याचा वापर केला जाणार आहे. या औषधाचे कोरोना रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. आता आम्ही तातडीने देशभरातील कोरोना रुग्णांना हे औषध उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे, हेटेरो कंपनीचे चेअरमन बी. पार्थ सारधी रेड्डींनी म्हटले आहे. देशातील रुग्णांना पुरेशा प्रमाणात औषध उपलब्ध करुन देण्यासाठी कंपनी सक्षम असल्याचेही रेड्डींनी स्पष्ट केले.