नवी दिल्ली -कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेत दोन लसींना मंजुरी दिली आहे. तातडीच्या वापरासाठी ऑक्सफर्ड-अॅस्त्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसीला औषध महानियंत्रक कार्यालयाने परवानगी दिली आहे. कोरोनावरील तज्ज्ञ समितीने या दोन लसींची शिफारस डीसीजीआयकडे केली होती. त्यास आज परवानगी मिळाली आहे. त्यामुळे भारतात लवकरच लसीकरण सुरू होणार आहे.
तज्ज्ञ समितीने केली होती शिफारस -
भारताचे औषध महानियंत्रक डॉ. वेणूगोपाल सोमानी यांनी नॅशनल मेडिकल सेंटर येथे पत्रकार परिषद घेत लसींना परवानगी दिल्याची माहिती दिली. कोरोना लसीबाबत निर्णय घेण्यासाठी भारत सरकारने सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेनच्या अंतर्गत विषय तज्ज्ञ समितीची (SEC) स्थापना केली होती. या समितीने दोन लसींची शिफारस डीसीजीआय कार्यालयाकडे केली होती. सीरम इन्स्टिट्य़ूट ऑफ इंडिया कंपनी आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीला भारतात परवानगी मिळाली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मोफत मिळणार -
संपूर्ण देशात कोरोना लस मोफत मिळणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केले होते. मात्र, त्यांनी लगेच युटर्न घेतला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फक्त प्राधान्य देण्यात आलेल्यांनाच लस मोफत मिळणार आहेत. पहिल्यांदा देशभरातील १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मोफत दिली जाणार आहे. त्यानंतर दोन कोटी आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना लस मोफत दिली जाणार आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदींनी केले ट्विट
डीसीजीयने कोरोना लसींना परवानगी दिल्यानंतर लगेच पंतप्रधान मोदींनी ट्विट केले. तातडीच्या वापरासाठी ज्या दोन लसींना परवानगी दिली आहे, या दोन्ही लसी भारतीय बनावटीच्या आहेत, याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटेल. आत्मनिर्भर भारतचे स्वप्न पूर्ण करण्यासाचा आपल्या वैज्ञानिकांचा उत्साह यातून दिसून येतो. जनतेच्या आरोग्याच्या काळजीमुळे हे शक्य झाल्याचे मोदी म्हणाले. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि स्वच्छता कर्मचारी या कोरोना योद्धांनी केलेल्या अप्रतिम कामाबद्दल आपण त्यांचे आभार मानू. कठीण परिस्थिती काम करून त्यांनी लोकांचे जीव वाचवल्याबद्दल त्यांचे आपण सर्व आभारी आहोत, असे मोदी म्हणाले.
लसीकरणाआधी झाली रंगीत तालीम -
काल (शनिवार) देशभरातील अनेक रुग्णालयांत कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. लसीकरण करताना येणाऱ्या अडचणी, लसीची साठवणूक आणि कर्मचाऱयांचे प्रशिक्षण योग्य पद्धतीने झाले आहे का? याची चाचपणी करण्यात आली. ऐनवेळी लसीकरणात कोणत्या अडचणी येतात, त्याशोधून त्यावर काम करण्यासाठी ही रंगीत तालीम होती. भारतातमध्ये एक कोटींपेक्षा जास्त कोरोनाचे एकून रुग्ण आहेत. त्यामुळे जगातील सर्वात मोठे लसीकरण भारतात होणार आहे.