लखनऊ -संरक्षण सामुग्रीची निर्यात पाच बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवण्याची आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) प्रमुख डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी अनेक देश भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे गुरुवारी म्हटले आहे. भारताच्या मित्र देशांना याची निर्यात केली जाऊ शकते, असे रेड्डी यांनी म्हटले आहे.
एका विशेष मुलाखतीत डीआरडीओ प्रमुखांनी भारतीय बनावटीच्या संरक्षण साहित्याची निर्यात पाच बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवणे शक्य असल्याचे म्हटले आहे. डीआरडीओ यात महत्त्वाची भूमिका निभावेल, असेही ते म्हणाले.
'ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र हे अत्यंत महत्त्वपूर्ण उत्पादनांपैकी एक असून आम्ही त्याच्या निर्यातीचा विचार करत आहोत. आम्हाला या क्षेपणास्त्राच्या प्रणालीविषयी अनेक प्रश्न मिळाले आहेत,' असे रेड्डी म्हणाले.