उन्नाव (उत्तर प्रदेश) - ड्रॅगनफ्रुटची शेती शेतकऱ्यांसाठी एखाद्या सोन्याच्या खाणीप्रमाणे आहे. एकदा याचे पीक घेतल्यानंतर पुढील तब्बल २५ वर्षे यातून ते नफा मिळवू शकतात. ऐकायला खोटे वाटत असले तरी हे १०० टक्के खरे आहे. आणि असे आम्ही नाही, तर शेतकरीच स्वतः सांगत आहेत. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्वात चांगले पीक म्हणजे ड्रॅगनफ्रुट.
ड्रॅगनफ्रुट हे एक विदेशी फळ आहे. या फळाला 'सुपर फ्रूट' समजले जाते. थायलंड, व्हिएतनाम, इस्राईल, श्रीलंका आणि मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणात या फळाचे उत्पादन होते. आता भारतातही काही ठिकाणी याचे पीक घेण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यामध्येही आता ड्रॅगनफ्रुटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागले आहे.
दीड वर्षांमध्ये रोपे मोठी झाली
मी याबाबत यूट्यूबवर माहिती पाहिली. हे फळ मुख्यतः मध्य आशिया वगैरे भागांमध्ये घेतले जाते. मी इंटरनेटवर सर्च केल्यावर समजले, की कोलकातामध्ये याची रोपे मिळत आहेत. त्यानंतर मी माझ्या मुलाला कोलकात्याला पाठवून ही रोपे आणली. साधारणपणे दीड वर्षांमध्ये ही रोपे मोठी झाली. या सर्वाचा एकूण खर्च सात लाख आला. आम्हाला सुरुवातीला वाटले, की आमच्या भागातील हवामानानुसार इथे हे पीक येणार नाही. मात्र यावर्षी झाडांना फळे लागलेली पाहून आम्ही बरेच आनंदी झालो. ही झाडे आता २५ वर्षांपर्यंत फळे देतील, असे आम्हाला समजले. आम्ही या झाडांना प्रामुख्याने नैसर्गिक खत घालतो. रासायनिक खतांचा वापर आम्ही टाळतो, असे शेतकरी विनोद कुमार गुप्ता म्हणाले.
ड्रॅगनफ्रुट गुलाबी रंगाचे असते. जे दिसायला खूप आकर्षक आहे. शिवाय याची चवही उत्कृष्ट असते. परदेशात या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सुमारे ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो या दराने ड्रॅगनफ्रुटची विक्री होते. आरोग्यासाठी फायद्याचे असल्यामुळे महाग असूनही या फळाला अधिक मागणी आहे. त्यामुळे अधिक पैसे मिळवण्याच्या दृष्टीने शेतकरी याची शेती करू लागले आहेत.
मे महिन्यापासून फळे येण्यास सुरुवात
आधीच्या पारंपरिक शेतीमध्ये अगदी कमी प्रमाणात नफा होत होता. त्यामुळे मी त्यात नवीन काय करता येईल, याबाबत इंटरनेटवर माहिती शोधत होतो. मी अनेक प्रकारची शेती पाहिली, मात्र त्यातलं काही मला समजलं नाही. यादरम्यान मला समजलं की काही फळे अशी आहेत, ज्यांचे विदेशात पीक घेतले जाते. मात्र, भारतात चांगली मागणी आहे. त्यानुसार संशोधन केल्यानंतर मी ड्रॅगनफ्रुटची शेती करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मी ही रोपे लावली होती. यावर्षीच्या मे महिन्यापासून फळे येण्यास सुरुवात झाली, असे शेतकरी विनोद कुमार गुप्ता म्हणाले.