रतलाम - 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' मानणाऱ्या रतलामच्या ८२ वर्षीय डॉ. लीला जोशी 'मदर तेरेसा ऑफ माळवा' म्हणून सर्वपरिचित आहेत. आदिवासी भागातील महिलांमधील अशक्तपणासह इतर आरोग्य समस्या दूर करण्यासाठी त्या अविरत झटतायत. या रुग्ण सेवेची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्कार घोषित केला आहे. आरोग्य क्षेत्रातील विशेषत: महिलांच्या आरोग्याबाबत त्यांनी केलेले कार्य जाणून घेण्याचा 'ईटीव्ही भारत'ने प्रयत्न केला आहे.
महिलांमधील अशक्तपणा (रक्ताची कमतरता) या रोगाशी सामना करण्यासाठी डॉ. जोशींनी एक अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत त्या अशक्तपणाने ग्रस्त महिलांना मोफत उपचार तर देतातच. शिवाय, या रोगासंदर्भात जनजागृतीदेखील करतात.
१९९७ साली डॉ. जोशी यांनी मदर तेरेसा यांची भेट घेतली होती. मदर तेरेसा यांच्या कार्याने प्रभावित होऊन डॉ. जोशींनी अशक्तपणाग्रस्त महिलांसाठी एक छावणी उभारून त्यांच्यावर मोफत उपचार करणे सुरू केले. हे अथक प्रयत्न आणि योगदानाची दखल महिला आणि बाल कल्याण विभागाने घेऊन २०१५ साली त्यांचा १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला. त्यानंतर यावर्षीचा म्हणजेच २०२० चा 'पद्मश्री' त्यांना जाहीर झाला.